पु. ल. देशपांडे
'पु.ल.' या नावाभोवतीच एक नवलाई प्राप्त झाली आहे. साहित्य, संगीत, नाट्य अशा कलाक्षेत्रांवर पु.लं.नी आपल्या चैतन्याचा चिरंतन ठसा उमटविला आहे. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी उदात्त मानवी मूल्यांची पूजा बांधली. स्वतः च्याच व्यंगावर विनोद करून मनाचा मोठेपणा दाखविला. अगदी बारशाचा साधा प्रसंग घ्या. मुलाचे नाव काय ठेवायचे, ही चर्चा चाललेली दहा घरच्या सुवासिनी आणि कुमारिका ह्या चर्चेत गुंतल्या होत्या. तिथे असणारी एक तीन वर्षांची चिमुरडी शुभाताई 'आपल्या भावाचे नाव काय ठेवायचे... मी सांगू मी सांगू' म्हणू लागली. 'सांग' असा आदेश मिळताच तिने 'बाळाचे नाव पु. ल. देशपांडे ठेवा' सुचविले. तशा स्त्रिया संकोचल्या. 'हे असले कसले नाव!' पु.लं. ना वाटले, साने गुरुजीनंतर आपणच बाळगोपाळांत लोकप्रिय दिसतोय. पण हे 'वाटणं' थोड्या वेळच टिकले तिथल्या आत्याबाई म्हणाल्या, 'अशोक नाव कसं सुंदर आहे? आपण तेच नाव ठेवूया बाळाला. पण शुभाताई कुठल्या ऐकायला! 'पु.ल. देशपांडेच पाहिजे म्हणून हट्ट धरला. 'हेच नाव का?' विचारताच शुभाताई म्हणाल्या, "इतक्या काळ्या मुलाचं नाव काय अशोक ठेवतात?" थोडक्यात अशोक नाव सुंदर आहे, पण काळेपणा, मठ्ठपणा इत्यादिकांचे माप म्हणून त्या बाळजगतात आपले नाव किलोसारखे वापरतात, असं म्हणत पु.ल. स्वतःवरच मनमोकळा विनोद करतात. बोचऱ्या जीवनाकडे हसऱ्या नजरेने कसे पाहावे, हे पु.लं.नी आम्हाला शिकविले.
---------------------------------------------------------
Read Also
माणसाबद्दलचा जिव्हाळा, सूक्ष्म निरीक्षण आणि अचाट कल्पनाशक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे पु.लं.चा विनोद तो सभ्यतेची मर्यादा सोडत नाही. पी. एल. याचा अर्थच पीस अॅण्ड लव्ह ज्या जगात मी आलो, ते जग मृत्यूपूर्वी सुंदर करून जाईन, ही पु.लं.ची जिद्द होती. प्रतिज्ञा होती.
पु.ल. हे अनेक अंगांनी बहरलेले व नाना रंगांनी नटलेले सदाबहार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या लहानपणाची एक आठवण सांगितली जाते. त्यांच्या वडिलांना
मृत्यूची वेळ, दिवस सारं अगोदरच समजलं होते. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी आपल्या मुलांच्या मुखातून अभंग ऐकावा हो त्यांची इच्छा. त्यानुसार त्यांनी पु.लं.ना 'आम्ही जातो आमच्या गावा' भजन म्हणायला सांगितले. प्राण सोडण्यापूर्वी त्यांनी पु.लं. च्या आईला जवळ बोलावून सांगितले, 'तू याचे मोठमोठे मानसन्मान बघशील. मला मात्र काही दिसणार नाही. मी जातो.' हे भाकीत खरे ठरले. पु.लं.च्या लेखनाने अनेक जिवांना लळा लावला. विरंगुळा दिला. जगण्याचे नवे बळ दिले.
---------------------------------------------------------
प्रसंग हिंदी चिनी युद्धाच्या वेळचा आहे. युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. त्याच्या अंगावर पुरेसे लोकरी कपडे नव्हते. त्याने शेकोटी पेटवली. बरोबर आणलेले काही दिवाळी अंक तो थंडीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला एका अंकात 'पु.ल. देशपांडे' हे नाव दिसले. लेखाचे नाव होते 'माझे खाद्यजीवन.' तो अंक आगीत टाकण्यापूर्वी त्याने वाचायला घेतला. त्या लेखातील चिवड्यावर तो जाम खूश झाला. कोल्हापुरच्या छत्रेच्या चिवड्याचा खुमासदारपणा पु.लं.नी तेवढ्याच खुमासदारपणे सांगितला होता.
त्या चिवड्याचे आद्यनिर्मात छत्रे हे वृद्ध झाले होते, लेख वाचून त्यांनाही गहिवरून आले, त्यांच्या अंगी चैतन्य अवतले. आणि आपले वृद्धत्व विसरून छत्रेनी स्वतःच्या हाताने चिवडा केला. डबा भरला. पु.लं. ना धाडला. सोबत दोन ओळी कळविल्या-'आजवर फक्त दोनदाच असा डबा माझ्याकडून दिला गेला आहे. पहिल्यांदा लोकमान्य टिळकांना आणि दुसऱ्यांदा रसिकमान्य पु.लं.ना अर्थात तुम्हाला.'
---------------------------------------------------------
Dont miss this valuable information
---------------------------------------------------------
हा सारा 'चिवडा' वृत्तान्त वाचून तो आघाडीवरचा मराठी सैनिक बेहद खूश झाला. खरं तर थंडीमुळे जिवाला तो पुरता वैतागला होता, पण निदान चिवडा 'खाण्यासाठी तर जगलेच पाहिजे असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला. पु.लं. च्या लेखाने त्याच्या जिवात जीव आला. त्याने पु.लं.ना कळविले- 'भाई, खरं सांगतो, मी आयुष्याला जाम वैतागलो होतो. तुमच्या लेखामुळे मला जगावेसे वाटले.' पु.लं.नीही त्याला कळविले, 'एखाद्या वाचकाला साहित्यातल्या शब्दामुळे जगावेसे वाटते, म्हणून तर पु.लं. सारख्या लेखकांना वाचकासाठी लिहावेसे वाटते.'
साहित्याचा आणि जगण्याचा असा सुंदर अनुबंध आहे. पु.लं.च्या साहित्यातील शब्दफुले माणसाचे सारे आयुष्य सुगंधित करतात. त्याला उजेडाचा वारसदार बनवितात आणि जीवनाला चैतन्याचा नवा सूर देतात.
संदर्भ -चैतन्याचे चांदणे
إرسال تعليق